Friday, June 11, 2010

unicorn घोडा...

परवा औंध कडून डांगे चौकाकडे unicorn गाडीवर येत होतो. रस्ता पण साफ होता, नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो. पण रक्षक चौकात लाल सिग्नल आडवा आला आणि जरा हिरमोडच झाला. गाडीचे break दाबून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. फारसी वर्दळ नव्हती त्यामुळे मोजून ५-१० गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नल मोठा असल्यामुळे मी गाडी बंद करून इकडे तिकडे बघत होतो. अचानक मागून टप टप असा आवाज आला. घोड्याच्या टापांचा आवाज असल्यासारखा वाटत होता. आणि खरच तो तोच आवाज होता. मी मागे वळून बघितले. एक पांढरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता. घोडेस्वार एक १६-१७ वर्षाचा मुलगा होता. सिग्नल लालच होता, त्यामुळे त्याने लगाम आवळली आणि घोडा बरोबर पांढऱ्या रेषेच्या मागे थांबला. अगदी माझ्या बाजूलाच. लाल सिग्नल, मी unicorn वर, बाजूला घोडा, असे एक विलक्षण चित्र होते. मला फार भारी वाटले. माणसांसाठी केलेले नियम प्राण्याने पण अचूक पाळावेत. जरा विचित्रच आहे!! timer १० सेकंदाच्या आत आले, मी गाडी चालू केली आणि घोडा काय करतो याकडे बघत बसलो. सिग्नल हिरवा झालं की घोडेस्वाराने टाच मारली, घोड्याला सिग्नल मिळाला. त्याने पवित्र घेतला आणि ऐटीत पांढरी रेघ ओलांडली. मी हे दृश्य बघत जरा वेळ तसाच होतो. मागच्या हॉर्नने भानावर आलो. गिअर टाकला आणि घोड्याला 'take over ' करून माझ्या वाटेकडे मार्गस्थ झालो.